"कोस्टल कर्नाटक "
एका बाजूला निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला हिरव्यागार वनश्रीने नटलेला पश्चिम घाट तर दुसऱ्या बाजूला नितळ असा निळाशार अरबी समुद्र आणि लांबच लांब पसरलेली स्वच्छ किनारपट्टी सोबत कारवारी आणि मंगलोरी मत्स्याहार ,
वाह क्या बात है !
बरेच दिवस मनात घर केलेली हि ट्रीप आम्हाला हुलकावण्या देत होती. यावेळीही नियोजित ट्रीप आमचे व्याही डॉ. वैद्य यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे जवळजवळ रद्द झाली होती. अनपेक्षितपणे हैद्राबादचे माझे बंधू डॉ. श्यामकांत आणि वाहिनी डॉ. श्रीलेखा यांनी हॉस्पिटलचा मोठा व्याप सांभाळून यायची तयारी दाखवली आणि योग जुळून आला.आता तयारी!
पाहिलं काम हैद्राबादवाल्यांच विमानाच तिकीट आणि हॉटेल बुकिंग.
मुलगा अभिजीतने नेहमीच्या उत्साहाने ती जबाबदारी पार पाडली. मंगलोरला आम्ही त्यांना भेटायचं आणि गोव्याला सोडायचं अस ठरलं. नवीन "मारुती एर्टीगा" गाडी आणि बरोबर आमचा चक्रधर उमेश बने. रविवार १६ फ़ेब्रु. २०१४ सकाळी ७ वाजता आम्ही स्टार्टर मारला आणि ट्रीपला सुरवात झाली.
पहिला पाडाव कागल.आमचे देवगडचे विक्री व्यवस्थापक श्री सुभाष पोवार यांचे गाव त्यांच्या आग्रहावरून त्यांच्या घरी दुपारी कोल्हापुरी तांबडा रस्सा पांढरा रस्सा यावर ताव मारून आम्ही संध्याकाळी सिरसीला पोहोचलो. आमचे स्नेही सिरसी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी श्री अब्दुल करीमसाहेब यांनी आमची उतरण्याची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. रात्री करीमसाहेब यांचे घरी स्पेशल कारवारी पद्धतीचा सामिष बडा खाना.
बडा मजा आया!
दुसर्या दिवशी सिरसी येथील सहस्त्रलिंग दर्शन, मारीकाम्बा मंदिर,चालुक्यकालीन संस्कृतीचे अवशेष असलेले बनवासी या ठिकाणांना भेट देवून आम्ही वाटेतील "याना' ह्या निसर्गाचा अदभूत चमत्कार समजल्या जाणाऱ्या स्थळाचे दर्शन घेवून रात्री मंगलोर मुक्कामी पोहोचलो. सकाळी डॉक्टर द्वयींना घेवून आमच्या कोस्टल ट्रीपला सुरवात झाली.मंगलोरपासून ४० कि.मी.अंतरावरील प्रसिद्ध'गोमटेश्वर मंदिर'आणि
'सहस्र खांबाचे' अप्रतिम शिल्पकाम असणारे जैन मंदिर बघून आम्ही उडुपी येथील मालपे बीच रिसोर्ट या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. संध्याकाळचे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य आणि रात्री समुद्रकिनारी लाटांचा आवाज कानात साठवत रंगलेली गप्पांची महफिल म्हणजे एक स्मरणीय अनुभव.
सिरसी,मंगलोर, उडुपी मुर्डेश्वर, गोकर्ण,कारवार आणी शेवटी गोवा.निसर्ग सौंदर्याचा अदभूत अनुभव.
विविध स्थळदर्शनाची मिळालेली माहिती आणी काही छायाचित्रे यातून आपल्यालाही ह्या आगळ्या वेगळ्या निसर्गरम्य ठिकाणाचे दर्शन घडवायचा हा एक प्रयत्न!
'सहत्रालिंग दर्शन'
सिरसी पासून १२ कि. मि. अंतरावरील प्रेक्षणीय स्थळ शाल्मली नदी पात्रातील वेगवेगळ्या खडकावर कोरलेल्या हजार शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. पर्वत राशीनी वेढलेल्या निसर्गरम्य परिसरातून वाहणारी शाल्मली नदी आणि त्यावरील झुलता पूल हे पर्यटकांचे आकर्षण आहे. अतसप्पा नायक नावाच्या राजाने पुत्रप्राप्तीसाठी देवर्षिनी सांगितल्याप्रमाणे हि १००० शिवलिंगे कोरली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली अशी आख्यायेका आहे.
'मारीकाम्बा मंदिर'

अंदाजे ३५० वर्षापूर्वीचे हे मंदिर उत्तर कर्नाटकातील आदिशक्तीचे एक मुख्य शक्तीपीठ मानले जते.
देवीची उंच आणि भव्य मूर्ती अतिशय आकर्षक आणि लक्ष्यवेधक आहे. दक्षिण भारतातील लाखो भाविक
दरवर्षाआड साजऱ्या होणाऱ्या मारीकाम्बा मातेच्या यात्रेला भेट देतात. देवीची रथयात्रा हे या यात्रेचे एक मुख्य आकर्षण आहे. या मंदिरासमोरील शिवालयही अलीकडील अतिशय सुंदर शिल्पकलेचा अविष्कार म्हणून जरूर पाहावे असे आहे .

मारीकाम्बा मंदिरापासून जवळच असणारे महाभारत काळापासूनचे संदर्भ लाभलेले हे स्थळ ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.कदंब,चालुक्य, पल्लव, व शतवाहन राजवंशाच्या संस्कृतीचे संदर्भ येथे पहावयास मिळतात.येथील 'मधुकेश्वर' मंदिर हे कदंब व चालुक्य कालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते. मधाच्या रंगाच्या भव्य शिवलिंगावरून ह्या मंदिराला मधुकेश्वर हे नाव मिळाले. ७ फुट उंचीचा अखंड दगडात कोरलेला नंदी,त्यावरील अप्रतिम नक्षीकाम, विष्णू व कार्तिकेय यांच्या सुंदर मूर्ती,नक्षीकाम केलेले अखंड दगडी खांब, छतावरील कोरीव काम हि शिल्पकार व वास्तुशात्रज्ञ यांच्यासाठी तर एक पर्वणीच आहे.
'याना'

सिरसीपासून ४० कि. मि. अंतरावरील हे पर्यटन स्थळ निसर्गाचा चमत्कार समजले जाते. काळ्या स्फटिका
सारख्या दगडाची भैरवेश्वर व मोहिनी ही शिखरे अंदाजे ४०० व ३०० फुट उंच आहेत. भैरवेश्वर शिखराच्या गुहेत निर्माण झालेले स्वयंभू शिवलिंग व त्यावर छतावरून अव्याहत ठिबकणारे पाणी हे गंगास्वरूप मानले जाते.शिखराकडे जाणारा अंदाजे २ कि.मी. मार्ग दाट वृक्षराशी बाजूने झुळझुळ वाहणारे पाणी आणि मार्गावरील धबधब्यामुळे अतिशय विलोभनीय आहे. पुराण काळातील भस्मासुराचा वध याच ठिकाणी झाल्याचे समजले जाते.भस्मासुराला भस्म करताना निर्माण झालेल्या आगीमुळे आधी चुनकळीचे असलेले खडक काळे पडले असे समजले जाते.
'गोमटेश्वर'
मंगलोर पासून ३२ कि.मी. अंतरावरील कारकला येथील डोंगरावर स्थापित केलेली बाहुबली श्री गोमटेश्वराची ४२ फुट उंचीची अखंड दगडात कोरलेली मूर्ती हि दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे.राजा वीरवर्माने आपले गुरु कारकाला जैन मठाधिपती ललितकीर्ती यांचे आज्ञेवरून ह्या अतिभव्य आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मूर्तीची १३ फेब्रु.१४३२ रोजी प्रतिष्टापणा केल्याचा संदर्भ आढळतो. या मुर्तीपुढील ब्रह्मदेव स्तंभ आणि त्यावरील यक्षगणाची कोरीव मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे.
'सहस्त्र खांबाचे जैन मंदिर'

कारकला पासून १२ कि.मी.अंतरावरील मूडबिन्द्री येथील सहस्त्र खांबाचे जैन मंदिर हे जैन धर्मीयांची काशी म्हणून ओळखले जाते.जैन धर्माचे ८ वे तीर्थकार चंद्रनाथ यांना समर्पित केलेले हे मंदिर प्राचीन शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी एक पर्वणी समजले जाते.या मंदिरातील एक हजार खांबावर जैन तीर्थकर,
श्रीकृष्ण व श्रीराम यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर चितारलेली आहेत. येथील तीर्थकर चंद्रनाथ यांची पंचधातूची मूर्ती, मानस्तंभ , छतावरील शिल्पे अप्रतिम आहेत.विशेष म्हणजे येथील ड्रगन आणि जिराफाची शिल्पे हि चीन आणि आफ्रिका खंडाशी त्याकाळात असलेले संबंध यांची आठवण करून देतात.
'मालपे बीच'

उडूपिपासून ४ कि.मी.अंतरावरील हा बीच शांत आणि लांबच लांब पसरलेल्या निसर्ग संपन्न किनार पट्टीसाठी प्रसिद्ध आहे.समुद्र किनाऱ्यावरील मालपे बीच रिसोर्ट येथे आमचा मुक्काम होता. आमच्या सूटमधून दिसरा सूर्यास्त म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारे आणि नजरेत साठवून ठेवावे असे अप्रतिम दृश्य.
रात्रीच्या निरव शांततेत समुद्राच्या लाटांचा ऐकू येणारा आवाज,दूरवर चमचमणारे बोटींवरील दिवे आणि आकाशातील अगणित तारे पाहत बसने हा एक केवळ विलक्षण अनुभव.तो प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा. मालपे बंदर हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मासे जगभरात निर्यात होतात.परासेलिंग स्पीड बोटिंग वाटर स्कीईंग या सागरी खेळांचा आनंद येथे लुटता येतो. बिचपासून जवळच असणाऱ्या सेंट मेरी आयलंड बहादूरगड किल्ला तसेच उडुपी येथील विविध देवस्थानाला भेट देता येते.मालपे बीच रेसोर्ट येथील आरामदायक निवास आणि डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य हा एक सुखद आणि या जागेचा निरोप घेताना हुरहूर लावणारा अनुभव.रात्री आमचा बीचवरच्या हॉटेलमध्ये मस्तपैकी मनसोक्त मत्स्याहार झाला.
'सेंट मेरी आयलंड'

नयनरम्य मालपे किनार्यापासून ६ कि.मी. अंतरावर असणारे हे बेत नारळाचे बेत म्हणूनही ओळखले जाते.बोटीने १५ मिनिटात येथे पोहोचत येते.Columnar basaltic लाव्हामुळे निर्माण झालेले अंदाजे
५०००० चौ.मी.क्षेत्रफळाचे हे बेट प्रमाणबद्ध अशा षटकोनी दगडांच्या आकृतीबंधामुळे निसर्गातील आश्चर्य समजले जाते.१४९८ साली वास्को द गमने पोर्तुगालहून येताना प्रथम येथे पाऊल ठवले आणि क्रुसाची स्थापना केली.पवित्र मेरी मातेच्या नावाने या बेटाचे नामकरण केले असा इतिहास आहे.
'उडुपी श्रीकृष्ण मठ'
उडुपी श्रीकृष्ण मठ हे देवस्थान उडुपी अष्टमठापैकी एक मुख्य मठ म्हणून समजले जाते.वेद्शास्राचे गाढे अभ्यासक श्री माधवाचार्य यांनी ७०० वर्षापूर्वी मकर संक्रातीच्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाच्या दुर्मिळ अशा बालामुद्रेतील मूर्तीची येथे स्थापना केली. द्वापार युगात अर्जुनाने द्वारकेत प्रतीष्टापणा केलेली हि मूर्ती असल्याची आख्यायिका आहे.मंदिरातील भव्य चांदीचे मखर, पितळी समया आणि बालमुद्रेतील श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय लक्षवेधक आहेत.जगभरातील उडुपी मंडळींचे हे एक श्रद्धास्थान आहे. जगभरातील लाखो भाविक दरवर्षी या मंदिराला श्रद्धेने भेट देतात. योगायोगाने आम्हाला येथे महाप्रसादाचे जेवण आणि दुर्मिळ असे मठाधिपती पर्यायस्वमिजी यांचे दर्शन झाले.
'कोल्लूर मुकाम्बिका मंदिर'
आम्ही कोल्लुरला पोहोचलो. येथील मुकाम्बिका मंदिर हे दक्षिण भारतातील ७ शक्तीपिठातील एक महत्वाचे आदीशक्ती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.मंदिरातील तांब्याचे छत आणि सोन्याचा महिरप पंचधातूची श्रीचक्रावरील स्थापित देवीची मूर्ती तसेच पंचमुखी गणपतीची मूर्ती हि या मंदिराची वैशिठ्ठे. या मंदिराच्या मूर्तीची स्थापना आदि शंकराचार्यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्लुर हून मुर्डेश्वरला जाताना बैंदूर बीच
ह्या सूर्यास्ताच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी गेलो. येथील SUNSET POINT वरून दिसणारा अथांग असा अरबी समुद्र लांबच लांब पसरलेला समुद्र किनारा आणी मावळतीला जाणाऱ्या सुर्यानारायाणाचे
अस्ताला जातानाचे क्षणा क्षणाला रंग बदलणारे बिंब पाहणे हा एक मनाला भुरळ पाडणारा आणि हुरहूरही लावणारा अनुभव.

'मुर्डेश्वर'

बैंदूर बीच वरून अस्ताला गेलेल्या सुर्यानारायाणाचा जड मनाने निरोप घेवून आम्ही कोस्टल कर्नाटक ट्रिपचे मुख्य आकर्षण असणाऱ्या मुर्डेश्वरला पोहोचलो.समुद्र किनाऱ्यावरील RNS RESIDENCY हॉटेलवरील आमच्या रुमच्या बाल्कनीतून देखण्या अतिभव्य मुर्डेश्वर शिवमूर्तीचे आणी गोपुराचे दर्शन डोळ्याचे पारणे फेडणारे होते.शिमोगा येथील प्रसिद्ध शिल्पकार काशिनाथ यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने हे भव्य शिल्प साकारले.येथील शिवालयात असलेले शिवलिंग हे भगवान शंकराने रावणाला वरदान म्हणून दिलेल्या आत्मलिंगाचा विखुरलेला भाग असल्याचे मानले जाते.मंदिरासमोरील १८ मजली भव्य गोपुरही लक्षवेधक आहे. मुर्डेश्वर जवळील शिराली बेटाजवळ स्कुबा डाईव्हिंग स्नोर्केलिंग चा आनंद लुटता येतो. मुर्डेश्वर किनाऱ्यावर साहसी सागरी खेळ खेळता येतात.
'जोग फॉल्स'

मुर्डेश्वर पासून ९० कि.मी.अंतरावरील शरावती नदीवरील ८३० फुट उंचीवरून रोरावत कोसळणारा हा धबधबा
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा ओळखला जातो.पावसाळ्यात याचे रौद्र स्वरूप पाहण्याची मजा वेगळीच असते.उंचीवरून कोसळणारे राजा राणी रोव्हर आणि रॉकेट या नावाने ओळखले जाणारे ४ धबधबे तंग बदलणारे दाट धुके त्यातून तयार होणारे इंद्रधनुष्य यांचा अविष्कार हा एक वेगळाच अनुभव. डोंगरकड्यातून जाणारा नागमोडी मार्ग बाजूने वाहणारी शरावती नदी आणि नदीच्या दुतर्फा पसरलेली नारळी पोफळीची वाऱ्यावर डुलणारी झाडी,दाट वृक्षराजीनी वेढलेला पश्चिम घाट याचे सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
'गोकर्ण महाबळेश्वर'

कोस्टल कर्नाटक ट्रिपचे आमचे Last Destination.१२ ज्योतिर्लिंगा पैकी काशी रामेश्वर इतकेच महत्वाचे मानले गेलेले स्थान. त्यामुळे या स्थानाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आहे.रावणाने भगवान शंकराच्या केलेल्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून मिळालेले आत्मलिंग येथे स्थापित झाल्याची आख्यायिका आहे.कैलास पर्वतावरून लंकेला जाताना चुकून खाली ठेवलेले हे आत्मलिंग महत्प्रयातनानेही रावण हलवू शकला नाही म्हणून याला महाबळेश्वर या नावानेही संबोधले जाते.येथील जवळपासचे ५ समुद्र किनारे विशेषता ओम आकारातील ओम बीच हे आत्मशान्तीच्या शोधात भारतात येणाऱ्या असंख्य विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.

पवित्र गोकर्ण महाबळेश्वर चे दर्शन घेवून आमच्या कोस्टल कर्नाटक ट्रीपची सांगता झाली.कारवारमार्गे
आम्ही पुढच्या मुक्कामी गोव्यातील पाल्मोलीन बीच येथील टूब्रिक रेसोर्टला पोहोचलो. सकाळी आमचे गोव्यातील परम मित्र शून्यातून स्वकर्तुत्वावर मोठे औद्योगिक विश्व निर्माण करणारे श्री. गणपत परब यांच्या कारखान्यांना भेट देवून त्यांचा गोयनकरि पाहुणचार घेवून ठरल्याप्रमाणे डॉक्टर द्वयिना विमानतळावर सोडले. मित्राच्या आग्रहाखातर गोव्यात आम्ही अजून एक दिवस मुक्काम वाढवला.प्रसिद्ध मंगेशी मंदिर आणि एक वेगळ आकर्षण 'बिग फुट' हे पोर्तुगीज कालीन गोव्याच दर्शन घडवणारे संग्रहालय पाहून परतीच्या प्रवासाला निघलो.

