Saturday, 29 March 2014

"कोस्टल कर्नाटक "


एका बाजूला निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला हिरव्यागार वनश्रीने नटलेला पश्चिम घाट तर दुसऱ्या बाजूला नितळ असा निळाशार अरबी समुद्र आणि लांबच लांब पसरलेली स्वच्छ किनारपट्टी सोबत कारवारी आणि मंगलोरी मत्स्याहार ,
वाह क्या बात है !
बरेच दिवस मनात घर केलेली हि ट्रीप आम्हाला हुलकावण्या  देत होती. यावेळीही नियोजित ट्रीप आमचे व्याही डॉ. वैद्य यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे जवळजवळ रद्द झाली होती. अनपेक्षितपणे हैद्राबादचे माझे बंधू डॉ. श्यामकांत आणि वाहिनी डॉ. श्रीलेखा यांनी हॉस्पिटलचा मोठा व्याप  सांभाळून यायची तयारी दाखवली आणि योग जुळून आला.आता तयारी!
पाहिलं  काम हैद्राबादवाल्यांच विमानाच तिकीट आणि हॉटेल बुकिंग.
मुलगा अभिजीतने नेहमीच्या उत्साहाने ती जबाबदारी पार पाडली. मंगलोरला आम्ही त्यांना भेटायचं आणि गोव्याला सोडायचं अस ठरलं. नवीन "मारुती एर्टीगा" गाडी आणि बरोबर आमचा चक्रधर उमेश बने. रविवार १६ फ़ेब्रु. २०१४ सकाळी ७ वाजता आम्ही स्टार्टर मारला आणि ट्रीपला सुरवात झाली.
पहिला पाडाव कागल.आमचे देवगडचे विक्री व्यवस्थापक श्री सुभाष पोवार यांचे गाव त्यांच्या आग्रहावरून त्यांच्या घरी दुपारी कोल्हापुरी तांबडा रस्सा पांढरा रस्सा यावर ताव मारून आम्ही संध्याकाळी सिरसीला पोहोचलो. आमचे स्नेही सिरसी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी श्री अब्दुल करीमसाहेब यांनी आमची उतरण्याची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. रात्री करीमसाहेब यांचे घरी स्पेशल कारवारी पद्धतीचा सामिष बडा खाना.
बडा मजा आया!
दुसर्या दिवशी सिरसी येथील सहस्त्रलिंग दर्शन, मारीकाम्बा मंदिर,चालुक्यकालीन संस्कृतीचे अवशेष असलेले बनवासी या ठिकाणांना भेट देवून आम्ही वाटेतील "याना' ह्या निसर्गाचा अदभूत चमत्कार समजल्या जाणाऱ्या स्थळाचे दर्शन घेवून रात्री मंगलोर मुक्कामी पोहोचलो. सकाळी डॉक्टर द्वयींना घेवून आमच्या कोस्टल ट्रीपला सुरवात झाली.मंगलोरपासून ४० कि.मी.अंतरावरील प्रसिद्ध'गोमटेश्वर मंदिर'आणि
'सहस्र खांबाचे' अप्रतिम  शिल्पकाम असणारे जैन मंदिर बघून आम्ही उडुपी येथील मालपे बीच रिसोर्ट या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. संध्याकाळचे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य आणि रात्री समुद्रकिनारी लाटांचा आवाज कानात साठवत रंगलेली गप्पांची महफिल म्हणजे एक स्मरणीय अनुभव.
सिरसी,मंगलोर, उडुपी मुर्डेश्वर, गोकर्ण,कारवार आणी शेवटी गोवा.निसर्ग सौंदर्याचा अदभूत अनुभव.
विविध स्थळदर्शनाची मिळालेली माहिती आणी काही छायाचित्रे यातून आपल्यालाही ह्या  आगळ्या वेगळ्या निसर्गरम्य ठिकाणाचे दर्शन घडवायचा हा एक प्रयत्न!

'सहत्रालिंग दर्शन'




सिरसी पासून १२ कि. मि. अंतरावरील प्रेक्षणीय स्थळ शाल्मली नदी पात्रातील वेगवेगळ्या खडकावर कोरलेल्या हजार शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. पर्वत राशीनी वेढलेल्या निसर्गरम्य परिसरातून वाहणारी शाल्मली नदी आणि त्यावरील झुलता पूल हे पर्यटकांचे आकर्षण आहे. अतसप्पा नायक नावाच्या राजाने पुत्रप्राप्तीसाठी देवर्षिनी  सांगितल्याप्रमाणे हि १००० शिवलिंगे कोरली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली अशी आख्यायेका आहे.

'मारीकाम्बा मंदिर'












अंदाजे ३५० वर्षापूर्वीचे हे मंदिर उत्तर कर्नाटकातील आदिशक्तीचे एक मुख्य शक्तीपीठ मानले जते.
देवीची उंच आणि भव्य मूर्ती अतिशय आकर्षक आणि लक्ष्यवेधक आहे. दक्षिण भारतातील लाखो भाविक
दरवर्षाआड साजऱ्या  होणाऱ्या मारीकाम्बा मातेच्या यात्रेला भेट देतात. देवीची रथयात्रा हे या यात्रेचे एक मुख्य आकर्षण आहे. या मंदिरासमोरील शिवालयही अलीकडील अतिशय सुंदर शिल्पकलेचा अविष्कार म्हणून जरूर पाहावे असे आहे .



'बनवासी'










मारीकाम्बा मंदिरापासून जवळच असणारे महाभारत काळापासूनचे संदर्भ लाभलेले हे स्थळ ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.कदंब,चालुक्य, पल्लव, व शतवाहन राजवंशाच्या संस्कृतीचे संदर्भ येथे पहावयास मिळतात.येथील 'मधुकेश्वर' मंदिर हे कदंब व चालुक्य कालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते. मधाच्या रंगाच्या भव्य शिवलिंगावरून ह्या मंदिराला मधुकेश्वर हे नाव मिळाले. ७ फुट उंचीचा अखंड दगडात कोरलेला नंदी,त्यावरील अप्रतिम नक्षीकाम, विष्णू व कार्तिकेय यांच्या सुंदर मूर्ती,नक्षीकाम केलेले अखंड दगडी खांब, छतावरील कोरीव काम हि शिल्पकार व वास्तुशात्रज्ञ यांच्यासाठी तर एक पर्वणीच आहे.


'याना'






सिरसीपासून  ४० कि. मि. अंतरावरील हे पर्यटन स्थळ निसर्गाचा चमत्कार समजले जाते. काळ्या स्फटिका
सारख्या दगडाची भैरवेश्वर व मोहिनी ही शिखरे अंदाजे ४०० व ३०० फुट उंच आहेत. भैरवेश्वर शिखराच्या गुहेत निर्माण झालेले स्वयंभू  शिवलिंग व त्यावर छतावरून अव्याहत ठिबकणारे पाणी हे गंगास्वरूप मानले जाते.शिखराकडे जाणारा अंदाजे २ कि.मी. मार्ग दाट  वृक्षराशी बाजूने झुळझुळ वाहणारे पाणी आणि मार्गावरील धबधब्यामुळे अतिशय विलोभनीय आहे. पुराण काळातील भस्मासुराचा वध याच ठिकाणी झाल्याचे समजले जाते.भस्मासुराला भस्म करताना निर्माण झालेल्या आगीमुळे आधी चुनकळीचे असलेले खडक काळे पडले असे समजले जाते.


'गोमटेश्वर'




मंगलोर पासून ३२ कि.मी. अंतरावरील कारकला येथील डोंगरावर स्थापित केलेली बाहुबली श्री गोमटेश्वराची ४२ फुट उंचीची अखंड दगडात कोरलेली मूर्ती हि दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे.राजा वीरवर्माने आपले गुरु कारकाला जैन मठाधिपती ललितकीर्ती यांचे आज्ञेवरून ह्या अतिभव्य आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मूर्तीची  १३ फेब्रु.१४३२ रोजी प्रतिष्टापणा केल्याचा संदर्भ आढळतो. या मुर्तीपुढील ब्रह्मदेव स्तंभ आणि त्यावरील यक्षगणाची कोरीव मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे.

'सहस्त्र खांबाचे जैन मंदिर'











कारकला पासून १२ कि.मी.अंतरावरील मूडबिन्द्री येथील सहस्त्र खांबाचे जैन मंदिर हे जैन धर्मीयांची काशी म्हणून ओळखले जाते.जैन धर्माचे ८ वे तीर्थकार चंद्रनाथ यांना समर्पित केलेले हे मंदिर प्राचीन शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी एक पर्वणी समजले जाते.या मंदिरातील एक हजार खांबावर जैन तीर्थकर,
श्रीकृष्ण व श्रीराम यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर चितारलेली आहेत. येथील तीर्थकर चंद्रनाथ यांची पंचधातूची मूर्ती, मानस्तंभ , छतावरील शिल्पे अप्रतिम आहेत.विशेष म्हणजे येथील ड्रगन आणि जिराफाची शिल्पे हि चीन आणि आफ्रिका खंडाशी त्याकाळात असलेले संबंध यांची आठवण करून देतात.

'मालपे बीच' 










उडूपिपासून ४ कि.मी.अंतरावरील हा बीच शांत आणि लांबच लांब पसरलेल्या निसर्ग संपन्न किनार पट्टीसाठी प्रसिद्ध आहे.समुद्र  किनाऱ्यावरील मालपे बीच रिसोर्ट येथे आमचा मुक्काम होता. आमच्या सूटमधून दिसरा सूर्यास्त म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारे आणि नजरेत साठवून ठेवावे असे अप्रतिम दृश्य.
रात्रीच्या निरव शांततेत समुद्राच्या  लाटांचा ऐकू येणारा आवाज,दूरवर चमचमणारे बोटींवरील दिवे आणि आकाशातील अगणित तारे पाहत बसने हा एक केवळ विलक्षण अनुभव.तो प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा. मालपे बंदर हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मासे जगभरात निर्यात होतात.परासेलिंग स्पीड बोटिंग वाटर स्कीईंग या सागरी खेळांचा आनंद येथे लुटता येतो. बिचपासून  जवळच असणाऱ्या सेंट मेरी आयलंड बहादूरगड किल्ला तसेच उडुपी येथील विविध देवस्थानाला भेट देता येते.मालपे बीच रेसोर्ट येथील आरामदायक निवास आणि डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य हा एक सुखद आणि या जागेचा निरोप घेताना हुरहूर लावणारा अनुभव.रात्री आमचा बीचवरच्या हॉटेलमध्ये  मस्तपैकी मनसोक्त मत्स्याहार झाला.

 'सेंट मेरी आयलंड' 












नयनरम्य मालपे किनार्यापासून ६ कि.मी. अंतरावर असणारे हे बेत नारळाचे बेत म्हणूनही ओळखले जाते.बोटीने १५ मिनिटात येथे पोहोचत येते.Columnar basaltic लाव्हामुळे निर्माण झालेले अंदाजे
५०००० चौ.मी.क्षेत्रफळाचे हे बेट प्रमाणबद्ध अशा षटकोनी  दगडांच्या आकृतीबंधामुळे निसर्गातील आश्चर्य समजले जाते.१४९८ साली वास्को द गमने पोर्तुगालहून येताना प्रथम येथे पाऊल ठवले आणि क्रुसाची स्थापना केली.पवित्र मेरी मातेच्या नावाने या बेटाचे नामकरण केले असा  इतिहास आहे.
   

'उडुपी श्रीकृष्ण मठ' 


उडुपी श्रीकृष्ण मठ हे देवस्थान उडुपी अष्टमठापैकी एक मुख्य मठ म्हणून समजले जाते.वेद्शास्राचे गाढे अभ्यासक श्री माधवाचार्य यांनी ७०० वर्षापूर्वी मकर संक्रातीच्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाच्या दुर्मिळ अशा बालामुद्रेतील मूर्तीची येथे स्थापना केली. द्वापार युगात अर्जुनाने द्वारकेत प्रतीष्टापणा केलेली हि मूर्ती असल्याची आख्यायिका आहे.मंदिरातील भव्य चांदीचे मखर, पितळी  समया आणि बालमुद्रेतील  श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय लक्षवेधक आहेत.जगभरातील उडुपी मंडळींचे हे एक श्रद्धास्थान आहे. जगभरातील लाखो भाविक दरवर्षी या मंदिराला श्रद्धेने भेट देतात. योगायोगाने आम्हाला येथे महाप्रसादाचे जेवण आणि दुर्मिळ असे मठाधिपती पर्यायस्वमिजी यांचे दर्शन झाले.

'कोल्लूर मुकाम्बिका मंदिर'


उडूपिपासून ७६ कि.मी. अंतरावरील या स्थळाकडे जाताना पश्चिम घाटाच्या हिरव्यागार वनश्रीचा अनुभव घेत
आम्ही कोल्लुरला पोहोचलो. येथील मुकाम्बिका मंदिर हे दक्षिण भारतातील ७ शक्तीपिठातील एक महत्वाचे आदीशक्ती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.मंदिरातील तांब्याचे छत आणि सोन्याचा महिरप पंचधातूची श्रीचक्रावरील स्थापित देवीची मूर्ती तसेच पंचमुखी गणपतीची मूर्ती हि या मंदिराची वैशिठ्ठे. या मंदिराच्या मूर्तीची स्थापना आदि शंकराचार्यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्लुर हून  मुर्डेश्वरला जाताना बैंदूर बीच
ह्या सूर्यास्ताच्या देखाव्यासाठी  प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी गेलो. येथील SUNSET POINT वरून दिसणारा अथांग असा अरबी समुद्र लांबच लांब पसरलेला समुद्र किनारा आणी मावळतीला जाणाऱ्या सुर्यानारायाणाचे
अस्ताला जातानाचे क्षणा  क्षणाला रंग बदलणारे बिंब पाहणे हा एक मनाला भुरळ पाडणारा आणि हुरहूरही  लावणारा अनुभव.






'मुर्डेश्वर' 







बैंदूर बीच वरून अस्ताला गेलेल्या सुर्यानारायाणाचा जड  मनाने निरोप घेवून आम्ही कोस्टल कर्नाटक ट्रिपचे मुख्य आकर्षण असणाऱ्या मुर्डेश्वरला पोहोचलो.समुद्र किनाऱ्यावरील RNS RESIDENCY हॉटेलवरील आमच्या रुमच्या बाल्कनीतून  देखण्या अतिभव्य मुर्डेश्वर शिवमूर्तीचे आणी गोपुराचे दर्शन डोळ्याचे पारणे फेडणारे होते.शिमोगा येथील प्रसिद्ध शिल्पकार काशिनाथ यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने हे भव्य शिल्प साकारले.येथील शिवालयात असलेले शिवलिंग हे भगवान शंकराने रावणाला वरदान म्हणून दिलेल्या आत्मलिंगाचा विखुरलेला भाग असल्याचे मानले जाते.मंदिरासमोरील १८ मजली भव्य गोपुरही लक्षवेधक आहे. मुर्डेश्वर जवळील शिराली बेटाजवळ स्कुबा डाईव्हिंग स्नोर्केलिंग चा आनंद लुटता येतो. मुर्डेश्वर किनाऱ्यावर साहसी सागरी खेळ खेळता येतात.

'जोग फॉल्स' 








मुर्डेश्वर पासून ९० कि.मी.अंतरावरील शरावती नदीवरील ८३० फुट उंचीवरून रोरावत कोसळणारा हा धबधबा
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा ओळखला जातो.पावसाळ्यात याचे रौद्र स्वरूप पाहण्याची मजा वेगळीच असते.उंचीवरून कोसळणारे राजा राणी रोव्हर आणि रॉकेट या नावाने ओळखले जाणारे ४ धबधबे तंग बदलणारे दाट धुके त्यातून तयार होणारे इंद्रधनुष्य यांचा अविष्कार हा एक वेगळाच अनुभव. डोंगरकड्यातून जाणारा नागमोडी मार्ग बाजूने  वाहणारी शरावती नदी आणि नदीच्या दुतर्फा पसरलेली नारळी पोफळीची वाऱ्यावर डुलणारी झाडी,दाट वृक्षराजीनी वेढलेला पश्चिम घाट याचे सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

'गोकर्ण महाबळेश्वर'







कोस्टल कर्नाटक ट्रिपचे आमचे Last Destination.१२ ज्योतिर्लिंगा पैकी काशी रामेश्वर इतकेच महत्वाचे मानले गेलेले स्थान. त्यामुळे या स्थानाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आहे.रावणाने भगवान शंकराच्या केलेल्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून मिळालेले आत्मलिंग येथे स्थापित झाल्याची आख्यायिका आहे.कैलास पर्वतावरून लंकेला जाताना चुकून खाली ठेवलेले हे आत्मलिंग महत्प्रयातनानेही रावण हलवू शकला नाही म्हणून याला महाबळेश्वर या नावानेही संबोधले जाते.येथील जवळपासचे  ५ समुद्र किनारे विशेषता ओम आकारातील ओम बीच  हे  आत्मशान्तीच्या शोधात भारतात येणाऱ्या असंख्य विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. 










पवित्र गोकर्ण महाबळेश्वर चे दर्शन घेवून आमच्या कोस्टल कर्नाटक ट्रीपची सांगता  झाली.कारवारमार्गे
आम्ही पुढच्या मुक्कामी गोव्यातील पाल्मोलीन बीच येथील टूब्रिक रेसोर्टला पोहोचलो. सकाळी आमचे गोव्यातील परम मित्र  शून्यातून स्वकर्तुत्वावर मोठे औद्योगिक विश्व निर्माण करणारे श्री. गणपत परब  यांच्या कारखान्यांना भेट देवून त्यांचा गोयनकरि  पाहुणचार घेवून ठरल्याप्रमाणे डॉक्टर द्वयिना विमानतळावर सोडले. मित्राच्या आग्रहाखातर गोव्यात आम्ही अजून एक दिवस मुक्काम वाढवला.प्रसिद्ध मंगेशी मंदिर आणि एक वेगळ आकर्षण 'बिग फुट' हे पोर्तुगीज कालीन गोव्याच दर्शन घडवणारे संग्रहालय पाहून परतीच्या प्रवासाला निघलो.   

Monday, 1 August 2011

चारधाम यात्रा

१०-१२ वर्षापूर्वी संरक्षण खात्याच्या हिम आणि हिमपात संशोधन संस्था (SNOW & AVALANCHE STUDY ESTT) मनाली येथे AVALANCHE PREDICTION SYSTEM म्हणजे हिमपात पूर्वसूचना प्रकल्पावर मला काम करण्याची संधी मिळाली.उत्तुंग हिमालयाचे ते माझे पहिले दर्शन! निसर्गाची भव्यता, क्षणोक्षणी बदलणारे त्याचे रूप,हिम्पाताच रौद्र स्वरूप सर्वच स्तिमित करणारे.तेव्हापासून ती हिमशिखरे मला साद घालत होती.आणि अनपेक्षितपणे योग जुळून आला.

MANGOWALE.COM ह्या  माझा  मुलगा  अभिजीतच्या नाविण्यापुर्वक  संकल्पनेच दुसर वर्ष. एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा जवळजवळ ४० दिवस देशांतर्गत आणि युरोप अमेरिका इ. ठिकाणीआंबा  विक्री करण्याच्या धामधुमीत कसे गेले ते समजलेच नाही.त्यानंतर अभिजितने श्रमपरिहारासाठी आमच्यासाठी एक SURPRISE GIFT दिली.

देवभूमी उत्तराखंड इथील चारधाम यात्रेच PACKAGE

भाग्यश्री  TRAVELS ह्या नामवंत यात्रा कंपनीच्या चारधाम यात्रेत आम्ही दि. १८ जून पासून सहभागी झालो
आणि सुरु झाला देवभूमिचा प्रवास!


चारधामची यात्रा कशी असते हे समजून घ्याचा सोपा मार्ग म्हणजे आपला डावा पंजा समोर धरायचा.
अंगठा म्हणजे हरिद्वार तर चार बोटे म्हणजे यमुनेत्री, गंगोत्री, केदारनाथ, आणि बद्रीनाथ.
चारधाम  यात्रेची सुरुवात होते हरिद्वार पासून.हरिद्वार म्हणजे खरोखरचे देव्भूमि चे  प्रवेशद्वार.रात्रीची गंगा आरती (हरिकी पौधी) म्हणजे एक विलक्षण अनुभव.विशाल गंगेच्या घाटावर जमलेला तेव्हडाच विशाल जनसमुदाय.३ ते ४ लाख लोकांच्या उपस्थितीत होणारी गंगा आरती. हिंदू जनमानसात गंगेला असलेल्या अढळ स्थानाची प्रचीती आली.




हरिद्वारहून निघून  नितांत सुंदर अश्या DOON VALLY तून १४ तासांचा दीर्घ   प्रवास करत आम्ही स्यानाचात्ती ह्या ठिकाणी पोहोचलो.यमुनोत्रीचा प्रवास इथून सुरु होतो.७  किमीचा अतिशय अवघड ट्रेक करून यमुनोत्री दर्शन होते.खडतर प्रवासाची झलक अनुभवून आम्ही परत स्यानाचात्ती ह्या मुक्कामाच्या जागी पोहोचलो.


त्यानंतर पुढचा प्रवास उत्तराकाशिमार्गे  पवित्र गंगोत्री.उत्तरकाशी येथील काशीविश्वेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक.शिवलिंग आणि त्रिशूल अगदी पाहण्यासारखे.अंदाजे १०० फुट उंचीचे हे त्रिशूल धातुशात्राचा चमत्कार समजले जाते.आणि विशेष म्हणजे हे अजस्त्र त्रिशूल बोटाच्या स्पर्शानेही हलवता येते.

पवित्र गंगोत्री म्हणजे मोक्ष प्राप्तीचे द्वार.
भगीरथाने महत्प्रयात्नाने स्वर्गालोकीची गंगा पृथ्वी तलावर आणली.त्यामुळे हिंदू जनमानसात ह्या स्थानाला अनन्यसाधारण  महत्व आहे.गात्र गोठवणाऱ्या थंड पण पवित्र गंगेच स्नान करून आम्ही पूर्वज आणि पुढच्या पिढीसाठी पवित्र गंगोत्रीच्या उगमस्थानी परमेश्वराची मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना केली. हा विधी एक वेगळाच आत्मिक समाधान देवून गेला.


पुढचा प्रवास परत उत्तरकाशी मार्गे केदारनाथ.अंदाजे ४०० किमीचा प्रवास,२ दिवसाच्या प्रवासानंतर केदारनाथ.
१४ किमी च्या खडतर ट्रेक नंतर दर्शन होते केदारनाथाचे.पांडवांना येथून स्वर्गप्राप्ती झाली अशी आख्यायिका


शब्द तोकडे पडावेत असे हिमालयाचे दर्शन क्षणोक्षणी बदलणारे निसर्गाचे रूप उन सावल्यांचा खेळ सूर्यप्रकाशात झलालणारी  हिमशिखरे सगळेच शब्दातीत!जगत्गुरू आद्य शंकराचार्य समाधीस्थळ आणि तेथील स्फटिक शिवलिंग अगदी पाहण्यासारखे. येतानाचा परतीचा प्रवास म्हणजे परमेश्वराने मुक्तहस्ते उधळण केलेला निसर्ग डोळ्यात साठवायचा यथाशक्ती प्रयत्न.


आता कूच करायची ती श्रीक्षेत्र बद्रीनाथ.हिंदू धर्मशास्त्रातील पवित्र चारधाम पैकी  एक.१२००० फुट उंचीवर असणारे श्री विष्णूचे हे पवित्र मंदिर.उत्तुंग हिमशिखरे त्यात वसलेले  पवित्र स्थान आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.यात्रेची सांगता आणि उंचीवरच्या हवेतील ऑक्सिजनची कमतरता ह्यामुळे थकवा जाणवू लागतो.


बद्रीनाथ नंतर सुरु होतो परतीचा प्रवास.
भारतातील आध्यात्मिक केंद्र र्हीशिकेश दर्शन करून हरिद्वार मार्गे दिल्ली आणि  मग इंडिगोच्या पुष्पक विमानाने स्वग्रही पुणे.अश्याप्रकारे चारधामची सांगता झाली

हिंदू धर्माशात्रात पवित्र समजले जाणार्या चारधामाचे दर्शन,गर्द हिरवाई, हिमालयाच्या कुशीतील नितांतसुंदर निसर्ग सौंदर्य,खळाळत वाहणाऱ्या पवित्र भागीरथी मंदाकिनी, अलकनंदा आणि त्यांचा संगम होऊन वाहणारी विशाल गंगा,प्रदूषणरहित हवा यामुळे खडतर प्रवासाचा काहीच त्रास जाणवला नाही.

विशेष आभार मानायला हवेत ते टीम भाग्यश्रीचे उत्कृष्ट भोजन, निवास व्यवस्था, तत्पर यात्रा व्यवस्थापक, यामुळे यात्रा सुसह्य झाली.बसच्या १२-१२ तासाच्या प्रवासाची सुरवात ईश्वराच्या आराधनेने व्हायची.मधल्या काळात सहप्रवाशांच्या विचारांची देवाणघेवाण,विविध गुणदर्शन यात वेळ कसा जायचा हे समजायचे नाही.
याचे श्रेय जाते आमचे यात्रा व्यवस्थापक श्री कोन्धालकर  यांना.

ह्या देवभूमीच्या प्रवासातील निसर्ग मी माझ्यापरीने छायाचित्रा द्वारे टिपण्याचा प्रयत्न केला आहे
सोबत त्याची लिंक जोडत आहे.
https://picasaweb.google.com/chandbhasale/CHARDHAM?authkey=Gv1sRgCNuHs4P4_vDD